/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.९: प्रचलित शिक्षण पद्धतीला फाटा देत आदिवासी विद्यार्थ्यांना फिरत्या प्रयोगशाळेतून विज्ञानाचे शिक्षण देण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात फिरत्या प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली असून, ही प्रयोगशाळा सुरुवातीला भामरागड, एटापल्ली आणि धानोरा या तीन तालुक्यांमधील १६ आश्रमशाळांमध्ये फिरणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ३८.७ टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची आहे. त्यात प्रामुख्याने माडिया व गोंड जमातींचा समावेश आहे. या जमाती असुरक्षित जमातींपैकी एक आहेत या आदिवासींचे जीवनमान उंचवावे, यासाठी आदिवासी विकास विभाग आणि शासनाने प्रचलित शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून भरपूर प्रयत्न केले. परंतु बालपणी मिळणाऱ्या शिक्षणाच्या अभावामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना प्रचलित शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे दृश्य आणि प्रयोगात्मक प्रणालीद्वारे शिक्षण दिल्यास आदिवासी मुलांमध्ये ज्ञानार्जनाची गोडी वाढेल, असा विचार आला. शिवाय २०१० मध्ये जिल्ह्यात शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३४ टक्के होते. भामरागड, एटापल्ली, धानोरा व कोरची या तालुक्यांमध्ये हे प्रमाण अधिक होते. ही बाब लक्षात येताच फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचा प्रयोग सुरु करण्यात आला.
एका बसमध्ये ही विज्ञान प्रयोगशाळा असून, त्यात टेस्ट ट्यूबस, सुक्ष्मदर्शी यंत्र यांच्यासह विविध उपकरणे, टीव्ही, लॅपटॉप आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करणारे विविध प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध आहेत. या प्रयोगशाळेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र इत्यादी विषयांचे जवळपास ८० प्रयोग शिकण्याची व्यवस्था आहे. हवामान बदल, खगोलशास्त्र आणि रोबोटिक्स याविषयांची माहितीही तक्ता आणि उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रहण करता येणार आहे.
या प्रयोगशाळेत ३ शिक्षक कार्यरत असून, मदतीला एक सहायक आणि बसचालक असणार आहे. ही बस भामरागड येथून भामरागड, एटापल्ली आणि धानोरा तालुक्यातील १६ शाळांमध्ये जाईल. प्रत्येक शाळेत आठवडाभर मुक्काम करुन विद्यार्थ्यांना शिक्षण देईल. यासाठी जवळपास ४ महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर पुन्हा नवीन प्रयोगांसह ही बस विद्यार्थ्यांच्या सेवेत हजर होईल, अशी माहिती भामरागड येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी दिली.
सुमारे २१०० विद्यार्थी या प्रयोगशाळेचा लाभ घेतील. त्यातील ५६ टक्के विद्यार्थिनी असतील. याचा लाभ दहावी आणि बारावीच्या परिक्षेत होईल. वर्गखोलीतील विज्ञानाच्या ज्ञानापेक्षा फिरत्या प्रयोगशाळेतून प्रयोग केल्यास विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होईल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होईल प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान आणि प्रयोगानंतर काही प्रश्न विचारले जातील, असेही शुभम गुप्ता यांनी सांगितले