/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२४: नुकत्याच पार पडलेल्या चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीदरम्यान माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश चामोर्शी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक झाली. त्यापैकी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २८ एप्रिलला होती. त्यासाठीचे नामनिर्देशनपत्र मागेघेण्याची अंतिम तारीख २० एप्रिल ही होती. त्याच दिवशीच्या पहाटे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी ठाण्यात बोलावून लाथाबुक्क्या व जोड्याने मारहाण केल्याचा आरोप त्या निवडणुकीतील एक उमेदवार आणि माजी सभापती अतुलगण्यार पवार यांनी केला होता. मारहाणीत गण्यारपवार यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे,या मागणीसाठी चामोर्शीसह अहेरी येथेही बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. शिवाय तशी तक्रारही अतुल गण्यारपवार यांनी केली होती. परंतु गुन्हा नोंद न झाल्याने गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती.
सुनावणीदरम्यान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर कलम २९४, ३२४, ३२६, ३४२ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश २० मे रोजी दिले आहेत. ॲड. संजय ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.पल्लवी केदार यांनी गण्यारपवार यांच्यातर्फे बाजू मांडली. हा निर्णय म्हणजे सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया गण्यारपवार यांनी दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे.प्रथम वर्ग न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पोलिस प्रशासन सत्र न्यायालयात दाद मागण्या च्यातयारीत असल्याची माहिती आहे.