/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
जयन्त निमगडे/ गडचिरोली
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व राष्टवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आर.आर.पाटील यांचे आज (ता.१६) मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. आबांचे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान असून, त्यांनी केलेली कामे मैलाचा दगड ठरली आहेत.
गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने पूर्वी मोठ्या प्रमाणावर विध्वंसक कारवाया होत होत्या. भूसुरुंगस्फोटाद्वारे पोलिसांचे वाहन उडविणे, पोलिस खब-या असल्याच्या संशयावरून सामान्य नागरिकांची नक्षल्यांकडून हत्या होणे या बाबींनी जिल्हा हादरत होता. २००९ मध्ये तब्बल ५२ पोलिसांचे नक्षल्यांनी बळी घेतले. नक्षल कारवायांबरोबरच गडचिरोली जिल्ह्याच्या मागासलेपणाचीही चर्चा केली जात होती. याच सुमारास विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आबा सांगली जिल्ह्यातील तासगाव मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. त्यावेळी विरोधकांनी व विशेषत: आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळाच्या सभागृहातच आबांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारण्याची विनंती केली. त्यावेळी आबांनी विरोधकांचे हे आव्हान स्वीकारले आणि १ जानेवारी २०१० रोजी आबा सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. आबांनी पालकत्व स्वीकारताच या जिल्ह्याचा चेहरा बदलला. आबांच्या कारकिर्दीत " न भुतो न भविष्यती" असा विकासात्मक बदल या जिल्ह्याच्या नागरिकांनी अनुभवला. एकीकडे नक्षली बंदुकीच्या गोळीने पोलिस आणि नागरिकांचे बळी घेत असताना कुणी येथे सैन्य पाठवा म्हणत होते, तर कुणी अर्धसैनिक बलाची मागणी करीत होते. त्यावेळी आबांनी "नक्षल समस्येचे उत्तर सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावर सापडणार नाही, तर विकास हेच त्याचे उत्तर आहे", असे ठणकावून सांगितले. पुढे एकएक पाऊल विचारपूर्वक उचलून त्यांनी विकासाची गती वाढवली. सर्वप्रथम त्यांनी या जिल्ह्याचा विकास निधी वाढवून दिला. त्यामुळेच २१ कोटींच्या जिल्हा विकासाचे बजेट १२५ कोटींवर पोहचले. विशेष म्हणजे २०१०-११ आबांनी तब्बल ३८५ कोटी रुपये वित्त विभागाकडून खेचून आणले. मागासलेल्या जिल्ह्यासाठी हे अप्रूपच होते. पारंपरिक वननिवासींना वनहक्काचे पट्टे वाटप करण्याकडे आबांनी कटाक्षाने लक्ष दिले. त्यामुळेच संपूर्ण राज्यात या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला. लेखामेंढा या गावातील ग्रामसभेला सर्वाधिकार देऊन गावाला बांबू व इतर गौण वनोपज विक्री करण्याचा घेतलेला निर्णय मैलाचा दगड ठरला. संजय गांधी निराधार योजना, राजीव गांधी विद्युतीकरण योजना, अपंग व अनुसूचित जाती, जमातींना जातीचे प्रमाणपत्र वाटप अशा विविध प्रकारच्या १७ योजनांचा लाभ सुमारे २ लाख ६० हजार ९७८ जणांना घेता आला, ही आबांचीच देण आहे. महाराष्ट व आंध्रप्रदेश सीमेवरील आणि गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल बांधण्यासाठी सुमारे १८५ कोटी रुपये मंजूर करण्याचे अविस्मरणीय काम आबांनी केले. शिवाय सिरोंचा ते छत्तीसगडला जोडणा-या इंद्रावती नदीवरही मोठ्या पुलाचे काम हाती घेतले, हे काम आता पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. या दोन्ही पुलांमुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांची ससेहोलपट थांबणार असून, व्यापार वाढण्यास मदत होणार आहे. शेतीला पाणी मिळावे, यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यासाठी त्यांनी कृषिपंपांना वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणच्या अधिका-यांना सतत कामाला लावले. जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतक-यांकडून खरेदी केलेला धान सडतोय, असे दिसताच आबांनी १६ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामास प्राधान्य देऊन ती कामे पूर्ण केली. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेकडो गावे अनेक वर्षांपासून अंधारात होती. आबांनी त्यांना वीजपुरवठा दिला. सुमारे ४१ हजार ३२९ कुटुंबांच्या घरात उजेड पोहचविण्याचे अभूतपूर्व काम आबांनी केले. गडचिरोली शहरात १५ कोटी ५६ लाखांचे महिला रुगणालय उभे करण्यातही आबांचा सिंहाचा वाटा आहे. आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे २०११ मध्ये गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करून आबांनी येथे परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. आबा येथेच थांबले नाहीत, तर शिक्षणाशिवाय मागासलेपण दूर होणार नाही, ही जाणीव असल्याने त्यांनी दुर्गम भागातील ५२ विद्याथ्र्यांना पुण्यातील सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेण्यास धाडले. धड बाराखडी वाचता न येणारे हे विद्यार्थी वर्षभरातच इंग्रजी वाचू लागले, ही आबांचीच देण आहे. नक्षलग्रस्त भागातील विद्याथ्र्यांना मोठमोठी शहरे दाखवून मोठे स्वप्र बघण्याची प्रेरणा देण्यासाठी आबांनी महाराष्ट दर्शन हा सहलीचा उपक्रम सुरू केला. आजतागायत शेकडो विद्याथ्र्यांनी या सहलीचा लाभ घेतला आहे. १८ आयटीआय, १८ आश्रमशाळा आणि २२ वसतिगृहे, तसेच रखडलेली ८ प्राथमिक आरोग्य केद्रे व १० उपकेंद्रांचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करून आबांनी आरोगय आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. नक्षल्यांशी लढण्यासाठी पोलिस कुमक अपुरी पडत असल्याचे लक्षात येताच आबांनी येथे पोलिस भरती घेऊन कुमक वाढविली. २४७८ पोलिसांची संख्या ४८३८ वर पोहचली. नक्षल्यांशी लढण्यासाठी आदिवासी भागातील जंगलातील खाचखडगे माहित असलेले पोलिसच हवेत, ही बाब आबांनी हेरली होती. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील आदिवासी युवक, युवतींना पोलिस भरतीत अग्रक्रम दिला. त्यांच्या कार्यकाळात तब्बल ३९६ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले.
आबा दयाळू, हळवे, विकासोन्मुख आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. मागासलेल्या जिल्ह्याला शिखरावर नेण्यासाठी त्यांची तळमळ होती. पालकमंत्री असताना एकदा आबा गडचिरोलीच्या दौ-यावर आले. सूर्य मावळतीकडे असताना आबा पोलिसांना दूर सारून एका कार्यकर्त्यात्र्याच्या मोटारसायकलवर बसले आणि गडचिरोली तालुक्यातील एका गावात पोहचले. तेथील प्राथमिक आरोग्य केद्रात गेले आणि सुविधांची पाहणी करुन आले. असे पालकमंत्री आता आम्हाला लाभणार नाही, ही खंत गडचिरोली जिल्हावासीयांना सतत बोचत राहील.
.. .. .. .. .. .. ..