शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपीस ५ वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा

Tuesday, 20th February 2018 07:02:47 AM

गडचिरोली, ता.२०: गावातील चौकात बसलेल्या मुलाला काठीने मारहाण करुन दुखापत करणाऱ्या आरोपीस येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी ५ वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पांडुरंग सखाराम भजभुजे रा.पारडी, ता.गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे.

ही घटना आहे १६ सप्टेंबर २०१५ ची. या दिवशी सकाळी ७ वाजताच्या सुमारास छत्रपती मृत्युंजय कुंभारे हा गावातील चौकात बसला असताना आरोपी पांडुरंग भजभुजे तेथे आला आणि तू मला शिवी देतोस असे म्हणून त्याने छत्रपतीच्या पायावर काठीने प्रहार करुन जखमी केले. त्यानंतर छत्रपतीची आई शांताबाई कुंभारे यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात पांडुरंग भजभुजेच्या विरोधात तक्रार केली. तक्रारीवरुन पोलिसांनी पांडुरंग भजभुजेविरुद्ध भादंवि कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल केला. सहायक फौजदार धनंजय पत्रे यांनी तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी पांडुरंग भजभुजे यास ५ वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. 

सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील लीना गजभिये यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून हवालदार यशवंत मलगाम व कोर्ट मोहरर पवन यवतकर यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
N5TA1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना