शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

Friday, 27th April 2018 08:02:14 AM

गडचिरोली, ता.२७: चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांनी भाजपकडे भाऊगर्दी केली असून, काँग्रेसकडेही काही निवडक मंडळींनी संपर्क साधला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी निवडून द्यावयाच्या सदस्यांची निवडणूक जाहीर केली असून, २१ मे रोजी ही निवडणूक घेण्याचे ठरविले आहे. ३ मे २०१८ ही नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम तारीख आहे. सध्या भाजपचे मितेश भांगडिया हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने उमेदवारांची चाचपणी करणे सुरु केले आहे. पैसे खर्च करणारा व विजयी होणारा उमेदवार भाजपला हवा आहे. हा निकष लक्षात घेता भाजप यंदा मितेश भांगडिया यांना पुन्हा तिकिट देऊ शकते. भाजपकडे असलेले पाचशेहून अधिक मतांचे संख्याबळ मितेश भांगडिया यांना सहज विजयी करु शकते. परंतु यावेळी श्री.भांगडिया निवडणूक लढण्याच्या मूडमध्ये नाहीत, असे सांगितले जाते. श्री.भांगडिया यांनी स्वत: निवडणूक लढण्यास नकार दिला, तरी त्यांचे मत विचारात घेतल्याशिवाय भाजप कुणाला तिकिट देणार नाही, असे जाणकारांना वाटते. असे झाल्यास श्री.भांगडिया हे आपले विश्वासू व्यक्ती म्हणून चिमूरचे वसंत वारजूरकर यांचे नाव पुढे करु शकतात. श्री.वारजूरकर हे अनेक दिवसांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. २००९ च्या चिमूर विधानसभा निवडणुकीत वसंत वारजूरकर यांनी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात तब्बल ६० हजार मते घेतली होती. भाजपची सत्ता नसताना वारजूरकरांनी त्यावेळी प्रचंड मते घेतल्याने भाजप नेतेही अवाक् झाले होते. त्यामुळे वारजूरकरांची लोकप्रियता लक्षात घेता भाजप त्यांना रिंगणात उतरवू शकते.

अभाविपचे नेते डॉ.रामदास आंबटकर यांच्याही नावाची भाजपमध्ये चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी श्री.आंबटकर यांनी मतदारसंघाचा दौरा करुन निवडक मंडळींच्या भेटी घेतल्या होत्या. तेव्हापासूनच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. सुधीर दिवे हे एक मोठे नाव चर्चेत आले आहे. सुधीर दिवे हे पूर्ती उद्योग समुहात मोठ्या पदावर असून, सध्या केंद्रीय जलसंधारण मंत्रालयात ते ओएसडी आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून दिवे यांना ओळखले जाते. वर्धा येथील शिक्षणसम्राट सचिन अग्निहोत्री, नागपूर महानगर पालिकेतील भाजपचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी, श्री.लाखानी यांचे नावही पक्षात भावी आमदार म्हणून घेतले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे व किशन नागदेवे यांची नावेही भाजपमध्ये चर्चिली जात आहेत. ३१ मार्चला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गडचिरोलीला आले होते. त्यावेळी त्यांनी श्री.पोरेड्डीवार यांना आपल्या शेजारी बसवून चर्चा केली होती. त्यामुळे पोरेड्डीवारांचे नाव यादीत आहे. बाबूराव कोहळे यांनी अख्खी हयात भाजपमध्ये घालवली आहे. परंतु त्यांना पक्षाने मोठे पद दिले नाही. त्यामुळे बाबूराव कोहळे यांच्या नावावर चर्चा होणे अपेक्षित असल्याचे काहींचे म्हणणे आहे. देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष किशन नागदेवे हेदेखील इच्छूक आहेत. दोनदा झालेल्या नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीत श्री.नागदेवे यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. त्यामुळे नागदेवे यांच नावही पक्षाला विसरता येणार नाही.

भाजपकडे उपरोक्त इच्छुकांची भाऊगर्दी असताना एक बलाढ्य नाव अचानक पुढे येऊ शकते, असे पक्षातील काही मंडळींचे म्हणणे आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेतील भाजपचे संख्याबळ लक्षात घेता याच पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे. मात्र, उमेदवार चंद्रपूर वा गडचिरोली जिल्ह्यातीलच असावा; तो बाहेरुन लादला जाऊ नये, अशी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. बाहेरील उमेदवार अनेकदा डीपीडीसीच्या बैठकांना दांडी मारतात व त्यांना विकासात फार रुची नसते, असे दिसून आले आहे. ही बाब लक्षात घेता भाजपने स्थानिक उमेदवाराचाच विचार करावा, अशी भावना पक्षाचे पदाधिकारी बोलून दाखवीत आहेत.

भाजपच्या तुलनेत काँग्रेसकडे मतांचे संख्याबळ बरेच कमी आहे. दोघांमध्ये २२७ मतांचा फरक आहे. त्यामुळे या पक्षाकडे तिकिट मागणाऱ्यांची फार गर्दी नाही. काँग्रेसतर्फे देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी व तेथीलच गणेश फाफट हेदेखील इच्छूक आहेत. मात्र, काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार यांच्या अर्धागिणी किरण वडेट्टीवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. खा.चव्हाण यांनी विधान परिषदेची जबाबदारी आ.विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे तुल्यबळ उमेदवार शोधून त्याला निवडून आणणे, हे वडेट्टीवारांपुढे आव्हान आहे. एकंदरित, ही विधान परिषद निवडणूक आ.वडेट्टीवारांची सत्वपरीक्षा घेणारी ठरेल, असे जाणकारांना वाटत आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
JE9RW
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना