/* */
शुक्रवार, 27 जानेवारी 2023
लक्षवेधी :
  झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत डॉ.परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर             गडचिरोली पोलिस दलातील २९ अधिकारी व जवानांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर           

हायकोर्टाने रद्द केली पत्नीचा खून करणाऱ्या पतीची जन्मठेपेची शिक्षा

Thursday, 9th September 2021 01:53:36 AM

नागपूर,ता.९: ‘अल्पवयीन मुलाचे बयाण हे आरोपीस शिक्षा देण्याचा आधार होऊ शकत नाही. मुलाचे बयाण प्रासंगिक आहे काय आणि त्याने सांगितलेल्या बाबी पुरावे व परिस्थितीशी जुळणाऱ्या आहेत काय, याचा विचार आधी शिक्षा सुनावणाऱ्या न्यायालयाने करणे आवश्यक आहे’, असे मत नोंदवून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीची हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली.

हत्येची ही घटना ४ एप्रिल २०१५ ची आहे. गडचिरोली तालुक्यातील अलोणी येथील रहिवासी अशोक मनिराम वड्डे याचा विवाह धानोरा तालुक्यातील लेखा येथील बबिता किरंगे नामक युवतीशी घटनेच्या ९ वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना ५ वर्षे वयाचा शुभम नामक मुलगाही आहे. अशोकला दारुचे व्यसन होते. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा. यामुळे बबिता आपल्या माहेरी गेली. तेथे ती दोन वर्षे राहिली. पुढे २७ जानेवारी २०१४ रोजी यापुढे बबिताला त्रास देणार नाही, असे पंचांसमक्ष् लिहून दिल्यानंतर अशोक तिला आपल्या घरी घेऊन गेला.

४ एप्रिल२०१५ च्या रात्री अशोकची पत्नी बबिता हिचा मृतदेह घराशेजारी आढळून आला. तिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले होते. या घटनेत अशोकचा ५ वर्षीय मुलगा हा एकमेव साक्षदार होता. याप्रकरणी पोलिसांनी अशोक वड्डे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली होती. त्यानंतर गडचिरोलीच्या सत्र न्यायालयाने १३ जुलै २०१६ रोजी इतर साक्षदार आणि अशोकच्या ५ वर्षीय मुलाचे बयाण नोंदवून त्याला जन्मठेप व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. यावर अशोक वड्डे याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपिल केले. त्यावर ५ वर्षे वयाचा लहान मुलगा घटनेची हकीकत स्पष्टपणे सांगू शकत नाही. त्याचे बयाण आणि उलटतपासणीत विरोधाभास होता. सरकारी पक्ष मुलाच्या बयाणाशिवाय अन्य ठोस पुरावे सादर करु शकला नाही. त्यामुळे बबिताची हत्या अशोक वड्डे यानेच केली, हे सिद्ध होऊ शकत नाही, असे मत व्यक्त करुन उच्च न्यायालयाने गडचिरोली सत्र न्यायालयाचा निवाडा रद्द करुन आरोपी अशोक वड्डे याची निर्दोष सुटका केली. न्या. व्ही.एम.देशपांडे व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ८ सप्टेंबर २०२१ रोजी हा निर्णय दिला. आरोपीतर्फे अॅड.एन.बी.राठोड यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3K1H0
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना