सोमवार, 29 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दहा जणांना अटक, अहेरी पोलिसांची कारवाई             रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत           

आत्राम आणि वडेट्टीवारांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे लोकांचे मनोरंजन

Monday, 15th April 2024 06:23:49 AM

गडचिरोली,ता.१५: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला असताना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप, प्रत्यारोपांच्या फैरीमुळे मूळ मुद्दे बाजूला पडले असून, मतदारांचे केवळ मनोरंजन होत असल्याचे दिसून येत आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान यांच्यात प्रमुख लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशोक नेते यांच्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम बरेच परिश्रम घेत आहेत, तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. दोघेही प्रचार सभा घेत आहेत. सुरुवातीच्या काळात जिल्ह्याचा विकास हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा होता. परंतु मागील चार-पाच दिवसांत हा मुद्दा मागे पडून धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप, प्रत्यारोपांचा मुद्दा गाजत आहे.

वडेट्टीवार हे लवकरच भाजपमध्ये जातील, असे वक्तव्य करुन आत्राम यांनी काँग्रेसची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर देत आत्रामांनी पुरावा द्यावा, असे आव्हान दिले. पुन्हा आत्राम यांनी जेथे बैठक झाली, त्या हॉटेलमधील सीसी टीव्ही फूटेज देणार असल्याचे सांगितले. यावरुन पुन्हा वातावरण गरम झाले आहे. एकूणच दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे लोकांचे केवळ मनोरंजन होत असल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन स्वत: प्रकाशझोतात राहण्यासाठी दोन्ही नेत्यांनी केलेला हा खटाटोप आहे, अशी संतप्त भावनाही नागरिक बोलून दाखवत आहेत.

आत्रामच का बोलतात, भाजप नेते का नाही?

वडेट्टीवार यांनी गडचिरोली-चिमूरची जागा प्रतिष्ठेची केली आहे. विदर्भातील या एकमेव मतदारसंघात ते ताकद लावत आहेत. अशावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वडेट्टीवारांना लक्ष्य करणे अपेक्षित असताना भाजप नेते त्यांच्या विरोधात बोलताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिनदा, तर चंद्रशेखर बावनकुळे एकदा जिल्ह्यात प्रचारसभेसाठी आले. परंतु ते वडेट्टीवारांबद्दल काहीच बोलले नाही. मात्र, आता आत्राम बोलत आहेत. यावरुन आत्रामांच्या तोंडून भाजप नेते बोलत आहेत का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. दुसरीकडे, धर्मराव आत्राम हे वडेट्टीवारांना विनाकारण डिवचून भाजपला अडचणीत तर आणत नाही ना, अशीही शंका लोक बोलून दाखवत आहेत.

काँग्रेस नेते वडेट्टीवारांची पाठराखण का करीत नाही?

एकीकडे धर्मरावबाबा आत्राम हे प्रत्येक सभेत विजय वडेट्टीवार यांच्यावर आरोप करीत असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र वडेट्टीवार यांची पाठराखण करताना दिसत नाहीत. अजूनपर्यंत काँग्रेसच्या राज्य पातळीवरील एकाही वरिष्ठ नेत्याने वडेट्टीवारांवरील आरोपांचे खंडन केलेले नाही. यावरुन वडेट्टीवार काँग्रेसमध्ये एकाकी तर पडले नाही ना, या चर्चेनेही जोर धरला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
OXV3D
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना