शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अबुझमाडच्या जंगलातील नक्षल शिबिर उद्ध्वस्त, शस्त्रांसह घोडेही पोलिसांच्या ताब्यात

Sunday, 13th August 2017 06:36:32 AM

गडचिरोली, ता.१३: नक्षल्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गडचिरोली व छत्तीगडच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील अबुझमाडच्या जंगलातील नक्षल शिबिर उद्ध्वस्त करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शस्त्रांसह घोडे व अन्य साहित्य जप्त केले आहे. अबुझमाडच्या जंगलातील नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त करुन त्यांचे घोडे ताब्यात घेण्याची ही आजवरच्या इतिहासातील मोठी कारवाई आहे.

भामरागड तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर अबुझमाडचा परिसर सुरु होतो. घनदाट जंगल आणि डोंगराळ भाग यामुळे तेथे नक्षल्यांशिवाय कुणीच पोहचू शकत नाही. असे सांगितले जाते. डोंगराळ भागामुळे नक्षलवादी ये-जा करण्यास व साहित्य पोहचविण्यासाठी घोड्यांचा वापर करतात. प्रचंड मोठा परीघ असलेल्या अबुझमाडच्या जंगलात नक्षल्यांचा शस्त्र कारखाना, हेलिपॅड व अन्य सुविधा असल्याचीही चर्चा होत असते. सर्व सुविधा व पोलिसांना पोहचण्यास प्रचंड अडचणी असल्याने हा भाग नक्षल्यांसाठी सर्वाधिक सुरक्षित समजला जातो. त्यामुळेच या जंगलातील डोंगरावर गणपती, भूपती व नक्षल्यांचे अन्य मोठे नेते वास्तव्य करीत असतात, असे सांगितले जाते. 

परंतु काल(ता.१२) गडचिरोली पोलिसांनी अबुझमाडच्या पहिल्या टोकाच्या पायथ्याशी पोहचण्यात यश मिळविले. अबुझमाडच्या पायथ्याशी नक्षल्यांचे शिबिर सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक(अभियान) डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथकाचे जवान काल अबुझमाड भागातील तुंडेवारा व कुपनार गावानजीकच्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. त्यावेळी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीदरम्यान पोलिस वरचढ होत असल्याचे पाहून नक्षलवादी त्यांच्याकडील साहित्य तसेच ठेवून पसार झाले. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा शोध घेतला असता ३ भरमार बंदुका व ६ घोडे ताब्यात घेतले. पोलिसांनी नक्षल्यांचे घोडे ताब्यात घेण्याची ही आतापर्यंतच्या नक्षल कारवायांच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

गडचिरोली पोलिस अबुझमाडच्या जंगलापर्यंत पोहल्याने आणि महिनाभरात ४ नक्षल्यांना कंठस्नान घातल्याने नक्षल चळवळीस जबर धक्का बसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
BAK0G
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना