मंगळवार, 16 जानेवारी 2018
लक्षवेधी :
   धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत             सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याची अफरातफर, देसाईगंज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल             पतंगाच्या मांजामुळे दोघे जण जखमी-गडचिरोलीतील घटना           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

गडचिरोली नगर परिषद:भाजपचे १८ नगरसेवक बंडाच्या पावित्र्यात?

Monday, 1st January 2018 08:04:49 AM

गडचिरोली, ता.१: केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना आणि ३२ वर्षांनंतर गडचिरोली नगरपरिषदेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता आल्यानंतरही विकासकामे होत नसल्याने, तसेच नगराध्यक्षांच्या पतीची कामकाजात लुडबूड होत असल्याने त्रस्त झालेल्या भाजपच्या २१ पैकी तब्बल १८ नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. 

१९ डिसेंबर २०१६ रोजी गडचिरोली नगर परिषदेवर पहिल्यांदाच एकहाती सत्ता आली. सत्तास्थापनेला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. त्यावेळी योगीता प्रमोद पिपरे यांना थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून येण्याचा बहुमान मिळाला आणि २५ सदस्यीय नगर परिषदेत भाजपचे २१ सदस्य निवडून आले. काँग्रेस व नगर विकास आघाडीचा प्रत्येकी एक व दोन अपक्ष नगरसेवक विजयी झाले. पुढे हे दोन अपक्ष नगरसेवक भाजपच्या गोटात शिरले. सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर स्वीकृत सदस्य घेण्याच्या हालचालींना वेग आला. त्यावेळी रमेश भुरसे, नंदकिशोर काबरा आणि प्रमोद पिपरे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागली. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत भाजपच्या शहरातील एका ज्येष्ठ नेत्यास, तसेच खुद्द खा.अशोक नेते यांच्या मर्जीतील एका युवा कार्यकर्त्यासही डावलण्यात आले आणि प्रमोद पिपरे यांनी आपली निवड करुन घेतली. पुढे नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभा होऊ लागल्या. बघता-बघता एक वर्ष पूर्ण झाले, परंतु शहराच्या चेहऱ्यात किंचीतही फरक पडला नाही. यामुळे लोकांना दिलेली आश्वासने कशी पूर्ण करायची, २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोकांपुढे कोणत्या तोंडाने जायचे, अशा प्रश्नांनी नगरसेवक अस्वस्थ होऊ लागले. शिवाय स्वीकृत सदस्य म्हणून प्रमोद पिपरे यांचा कामकाजात हस्तक्षेप वाढू लागला. ठराव मंजूर होऊनही त्यांची अंमलबजावणी होण्याची चिन्हे दिसत नाही, असे लक्षात येताच तब्बल १८ नगरसेवकांनी पिपरेंच्या विरोधात वेगळी मोहीम उघडली. गेल्या दोन महिन्यांत या असंतुष्ट नगरसेवकांच्या अनेक बैठका झाल्या. २६ डिसेंबरला झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एका नगरसेवकाने प्रमोद पिपरे यांना 'तुम्ही स्वीकृत नगरसेवक आहात, तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही', असे सुनावून टाकले. तसेच सर्व असंतुष्ट नगरसेवकांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते यांनाही लेखी निवेदन देऊन विकासकामे होत नसल्याची तक्रार केली. सध्या हे असंतुष्ट नगरसेवक पिपरे यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. ३१ डिसेंबरला पिपरे यांनी नगरसेवक व मित्रमंडळींना एका शेतात स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते. परंतु १८ नगरसेवकांनी त्यांचे 'आवतन' नाकारुन वेगळी पार्टी आयोजित केली.

वर्षभरात केवळ काही खरेदीची कामे झाली. मात्र, अनेक वॉर्डातील गटारे स्वच्छ केली जात नाहीत, नागरिकांना पिण्याचे पाणी सुरळीत उपलब्ध होत नाही, खराब रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, घंटागाड्या नियमित येत नाही, ठरावांची अंमलबजावणी होत नाही, शहरातील खुल्या जागेवर बगिचा निर्माण करण्याची मागणीही पूर्ण झाली नाही. अनधिकृत बांधकाम वाढल्याने नगर परिषदेचे मोठे नुकसान होत आहे, त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे, अशा विविध प्रश्नांवर नगरसेवक प्रचंड नाराज आहेत. विकासकामांना वेग आला नाही, तर हे सर्व नगरसेवक प्रमोद पिपरे यांना स्वीकृत नगरसेवकपदावरुन हटविण्याची मागणी करतील आणि मागणी पूर्ण होईपर्यंत कामकाजावर बहिष्कार घालतील, अशी माहिती एका नगरसेवकाने दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
H4I4H
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना