मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

शहीद जवानाची पत्नी झाली उपशिक्षणाधिकारी

Wednesday, 17th January 2018 12:43:12 AM

गडचिरोली, ता.१६: पतीचा मृत्यु झाल्यानंतर पत्नी आणि अख्ख्या कुटुंबाची काय हालत होते, हे आपण अवतीभवती पाहत असतो. परंतु एका पोलिस जवानाच्या निधनानंतर त्याच्या पत्नीने धैर्याने परिस्थितीला तोंड देत यशाची एकेक शिखरे पादाक्रांत केली आणि आज ती उपशिक्षणाधिकारी झाली.

ही गोष्ट आहे श्रीमती हेमलता जुरु परसा या विधवेची. हेमलता आणि जुरु दोघेही गोंड-माडिया आदिवासी. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हिदूर हे जुरु केये परसा यांचे गाव. घरची परिस्थिती बेताची. दहावीपर्यंत त्यांनी लोकबिरादरी आश्रमशाळेत अध्ययन केले. तेथे असताना डॉ.प्रकाश आमटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन जुरुंनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि ते पोलिस दलात भरती झाले. नोकरीनंतर कुरखेडा तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या हेमलता नैताम यांच्याशी जुरुचे लग्न जुळले. हेमलता तेव्हा एम.ए. बी.एड. झालेल्या. त्या आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथील वैनगंगा विद्यालयात शिक्षिका होत्या. लग्नानंतर दोघेही गडचिरोली येथे राहू लागले. लग्नाला चार महिने होत नाही, तोच लाहेरी येथे नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत जुरु शहीद झाल्याची बातमी आली. तो दिवस होता ८ ऑक्टोबर २००९. संसाराच्या वेलीवर फूल उमलण्याआधीच पतीला वीरमरण आल्याने हेमलताचे अवसान गळाले. खरे तर ऐन तारुण्यात पतीचे निधन झाल्यानंतर दुसरे लग्न करावे, असे कुण्याही विधवा महिलेला वाटणे स्वाभाविक होते. परंतु हेमलताने लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

दु:खाच्या काटेरी वाटेवरुन चालताचालता ६ वर्षे निघून गेली. अखेर पोलिस विभागाने धैर्याचा हात पुढे केला आणि २०१५ मध्ये हेमलता गटशिक्षणाधिकारी झाल्या. यशाचे एक शिखर पादाक्रांत झाले होते. परंतु जिद्द आणि चिकाटी कायम होती. हेमलताने पुन्हा पदर खोचला. शहीद पतीला सलामी देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यंदा १० जानेवारीला आयोगाने निकाल जाहीर केला आणि त्यात हेमलताची निवड झाली. ध्यानसाधना करणाऱ्या एखाद्या योग्याच्या कपाळावर लख्ख प्रकाश दिसावा, तसाच यशाचा प्रकाश हेमलताच्या कुंकू पुसलेल्या कपाळावर पडला. या यशाने हेमलताच्या आप्तांना जसा आनंद झाला, त्यापेक्षा शहीद जवानाची विधवा पत्नी उपशिक्षणाधिकारी झाल्याचा अभिमान पोलिस अधिकाऱ्यांना वाटला. संवेदनशिल म्हणून ओळखले जाणारे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी हेमलताला बोलावून घेतले आणि शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. हेमलता जुरु परसा यांच्या जिद्दीला सलाम! 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
B144Z
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना