/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१: राजकारण तर दररोज चालायचंच, पण त्यापलिकडे जाऊन एक विरंगुळा म्हणून गडचिरोलीतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना रंगपंचमीच्या दिवशी एकत्र आणायचं आणि धूळवळ साजरी करायची, असा विचार काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मनात आला. त्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत 'चाय पे चर्चा' झाली आणि सर्वप्रथम रंगपंचमीच्या दिवशीचं 'पेय' कोणतं असावं, या अतिमहत्त्वाच्या विषयावर खल झाला. काहींनी नेतेमंडळी मोठी असल्याने 'ब्रँड' चा विषय पुढे केला. एक-दोघांनी स्वदेशीच्या मुद्द्यालाही स्पर्श करुन पाहिला. परंतु एका पर्यावरणवाद्याने 'इको फ्रेंडली होली' चा मुद्दा रेटून मोहफुलांच्या पौष्टिकतेकडे सर्वांचे लक्ष वेधले. शेवटी त्याच्याच मतावर सर्वांचे एकमत झाले. मग विषय आला स्थळाचा. काहींनी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह हे स्थळ सुचवले. परंतु कमी-जास्त झालेच तर कुणाला कुणकुण लागू नये म्हणून सर्किट हाऊस हे निर्जन स्थळ ठेवावे, अशी सूचना एकाने केली. 'व्वा, काय आयडिया आहे!', असे म्हणत सर्वांनी सर्किट हाऊसचा पर्याय मान्य केला.
पेय ठरले, स्थळ ठरले, खाण्याचा मेन्यूही ठरला. पण, सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांना एकत्र आणणार तरी कोण? हा प्रश्न सर्वांना भेडसावू लागला. जो-तो एकमेकाकडे बोट दाखवू लागला. अशातच एकाने अहेरीचे बबलू हकीम यांचे नाव सुचविले. सर्वांशी मधूर संबंध असल्याने बबलूभाईच ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडू शकतील, असा आत्मविश्वास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकू लागला आणि कार्यक्रम फायनल झाला.
रंगपंचमीचा दिवस उजाडला. सर्किट हाऊसमधील व्हीआयपी सूट राजेसाहेबांसाठी राखीव होताच. झेंडावंदनाप्रमाणेच धुलिवंदनाचा कार्यक्रमदेखील सकाळीच होत असल्याने राजेसाहेब रात्रीच मुक्कामी आले होते. तिकडे बाबा, दादा आणि भाऊ यांचा ताफाही अहेरीवरुन एकमेकांना ओव्हरटेक करीत भल्या सकाळीच सर्किट हाऊसवर पोहचला. आरमोरीवरुन आनंदराव गेडाम हेही निघाले. इकडे सर्वजण आल्याचे माहित होताच खा.अशोक नेते, आ.देवराव होळी, मारोतराव कोवासे आणि नामदेव उसेंडी हे धावतधुपतच आले. मात्र, देसाईगंजवरुन बरेच आधी निघूनही आ.क्रिष्णा गजबे यांना पोहचण्यास विलंब झाला. वाटेत त्यांना आरमोरीत थांबावे लागल्याने विलंब झाल्याचे नंतर सर्वांना समजले. त्यांच्या मागेमागे कुरखेड्यावरुन सुरेंद्रसिंह चंदेल हेही दाखल झाले. प्रत्येक जण आपापल्या सूटमध्ये गेले. कुणी अरततोंडीमध्ये, कुणी खोब्रामेंढात, तर कुणी टिप्पागडमध्ये. प्रत्येकाने आपापल्या पक्षानुसार रंग आणले होते.
इकडे धर्मरावबाबा टिप्पागड सूटमध्ये आपल्या समर्थकांसह वाट बघत होते. परंतु बराच वेळ होऊनही राजेसाहेब बाहेर न आल्याने बाबा संतापले होते. 'इगटा मनम पिढीता रहिवासी राजा मनता. उडीला राजा मनकू पजेन हिरसेक मणतोर' असे म्हणून गोंडी भाषेतून बाबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रकाश गेडाम यांनी गोंडी भाषेवर एक पुस्तक लिहिल्याने बाबा काय म्हणत आहेत, हे त्यांना कळले. परंतु राजेंना निरोप देणे त्यांच्यासाठी जरा अवघडच होते.
कारण पहाटेपर्यंत कार्यकर्त्यांशी हितगूज करावी लागल्याने राजेसाहेब गाढ झोपेत होते. एवढ्यात आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते दीपक आत्राम व अजय कंकडालवार हेदेखील व्हीआयपी सूटच्या प्रवेशद्वारावर आले. तेही बराच वेळ तात्कळत राहिले. राजे बाहेर येत नसल्याने त्यांनी 'नुववू अयते अहेरी इस्टेट दि राजा. मनाशी नैनू अयते मंदी मनसुला राजा ऐनानू पदा वेल्ली पोदामू इकडनुंची' अशा शब्दात तेलगू भाषेतून आपली नाराजी व्यक्त केली. मात्र, दादा आणि अजयभाऊंची भाषा कुणालाच कळली नाही. परंतु वृत्तसंकलनासाठी आलेले महेश तिवारी व व्यंकटेश दुडमवार हे दोन तेलगुभाषिक पत्रकार बाजूलाच उभे होते. दादा आणि भाऊ चांगलेच खवळल्याचे दोघांच्याही लक्षात आले. त्यांनी ही बाब प्रकाश गेडाम यांच्या कानावर घातली. त्यानंतर प्रकाशभाऊंनी राजेसाहेबांना उठविण्यासाठी भीतभीतच दरवाजा ठोठावला. राजेसाहेबांनी डोळे चोळत दरवाजा उघडून प्रकाश गेडाम यांना विचारणा केली. त्यावर 'संघा'चे लोक आले आहेत, असे प्रकाशभाऊंनी सांगितले. 'संघा'चे लोक म्हणताच राजेसाहेब ताडकन बाहेर आले. बघतात तर काय? आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते बाहेर होते! यावर हिंदीतून नाराजी व्यक्त करीत राजेसाहेबांनी दरवाजा लावण्याचे फर्मान सोडले आणि पुन्हा आत जाऊन डुलक्या घेण्यास सुरुवात केली.
इकडे सूर्य वर जाऊ लागला होता. आता ड्रमभरुन आणलेल्या रंगाचं काय करायचं? असा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत होता. शेवटी राजेसाहेबांना उशिर असल्याने आपणच कार्यक्रम सुरु करुन टाकू, अशी सूचना खा.अशोक नेते यांनी केली. मग, खा. अशोक नेते, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.देवराव होळी, आ.क्रिष्णा गजबे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, दीपकदादा आत्राम, सुरेंद्रसिंह चंदेल व अजय कंकडालवार एकत्र आले. सर्वजण 'तेरा तन डोले, मेरा तन डोले....' हे गाणे गुणगुणत एकमेकांना रंग लावू लागले. एवढ्यात बाबांनी एका मोठ्या पिचकारीतून सर्वांवर ओल्या रंगाची बौच्छार केली. सर्वजण चिंबचिंब झाले. इकडे बाहेर वाजेवालेही रंगात आले होते. मग सर्वजण 'होली आयी रे होली आयी रे रंग रंगिलोंकी होली आयी रे' या गाण्यावर नाचू लागले.
बाहेरच्या या कर्णकर्कश आवाजामुळे राजेसाहेबांची झोप मोडली. आता या सर्वांना आपले 'रंग' दाखवायलाच हवेत, असा निर्धार राजेसाहेबांनी केला. परंतु वारंवार सांगूनही कार्यकर्त्यांनी जबाबदारी एकमेकांवर ढकलल्याने रंगाची व्यवस्था झाली नव्हती. त्यामुळे राजेसाहेबांनी पुन्हा संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. रंग लावायचाच. पण तो नैसर्गिकच हवा, अशी सूचना राजेसाहेबांनी कार्यकर्त्यांना केली.(कारण आपण कोणत्या खात्याचे मंत्री आहोत, याची त्यांना जाणीव होती.) कार्यकर्ते तर रंगाची व्यवस्था करतीलच. पण, प्रोटोकॉल म्हणून आपल्या वरिष्ठ मंत्र्यांचा सल्ला घ्यावा, म्हणून त्यांनी सुधीरभाऊंना फोन लावला. 'मी पळसाच्या फुलांचा अर्क वापरला', असे सुधीरभाऊंनी सांगितले. मात्र, आपल्याकडे दुसरेही एक खाते आहे. त्यामुळे त्या खात्याच्या मंत्र्यांना नाराजी वाटायला नको, असे म्हणून राजेसाहेबांनी आपल्या दुसऱ्या खात्याच्या मंत्र्यांना कॉल केला. त्यांनी सांगितले, 'राजे, तुम्ही 'सावरी'च्या फुलांचा रंग वापरा'. राजेसाहेबांना ही दुसरी कल्पना खूपच आवडली. 'व्वा, काय भन्नाट कल्पना आहे! याला म्हणतात 'पार्टी विथ डिफरन्स!', असे पुटपुटत राजेसाहेबांनी रंगाची व्यवस्था झाल्याचे समाधान व्यक्त केले.
काही क्षणातच 'होली खेले रघुविरा अवध में होली खेले रघुविरा...' हे गाणं म्हणत राजेसाहेब बाहेर आले आणि सर्वांवर छोट्या बादलीने रंग ओतण्यास सुरुवात केली. बाकीच्यांनीही राजेसाहेबांना रंग घुसळले. सर्वांचे अवतार पाहून कोण काँग्रेसचा, कोण राष्ट्रवादीचा, कोण शिवसेनेचा आणि कोण भाजपचा? काही कळेनासे झाले होते. मात्र, राजेसाहेबांनी सावरीच्या फुलांचा भगवा रंग उधळल्याने सुरेंद्रभाऊ मनोमन खूश दिसत होते. नंतर सर्वांनी फ्रायडेच्या पर्वावर फिश फ्राय आणि चिकन फ्रायचा फडशा पाडला आणि सर्वजण आपले मूळ रंग धरुन मार्गस्थ झाले.
(लेखक-जयन्त निमगडे. हा मजकूर काल्पनिक आहे. कृपया कुणीही मनावर न घेता त्याचा आनंद घ्यावा)