शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वनाधिकाऱ्यांनी काढले मोटवानींनी वनजमिनीवर केलेले अतिक्रमण

Wednesday, 11th April 2018 08:22:41 AM

गडचिरोली, ता.११: वनविभागाच्या राखीव जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी आज देसाईगंजच्या वनाधिकाऱ्यांनी राजकुमार अर्जुनदास मोटवानी यांच्यावर कारवाई करीत अतिक्रमण काढून जमीन ताब्यात घेतली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, राजकुमार मोटवानी यांनी वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत वडेगाव रिठ येथील सर्व्हे क्रमांक १०९/२ मधील क्षेत्र ०.८५ हेक्टर आर जमिनीवर अतिक्रमण केले आहे. याप्रकरणी मोटवानी यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ५२(ग)क अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. अतिक्रमित वनजमीन ही राज्य शासनाच्या १३ ऑगस्ट १९५५ च्या अधिसूचनेन्वये अधिसूचित वनक्षेत्र असून, ती राज्य शासनाने संरक्षित वन म्हणून घोषित केली आहे. याबाबत राज्य शासनाच्या विविध निर्णयान्वये वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे अधिकार सहायक वनसंरक्षक वा उपविभागीय वनाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राजकुमार मोटवानी यांनी ०.८५ हेक्टर क्षेत्रावर केलेले अतिक्रमण चौकशीअंती काढून टाकण्याची शिफारस वडसा वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी ४ एप्रिल २०१८ च्या पत्रान्वये केली होती. त्याअनुषंगाने कुरखेडा येथील उपविभागीय वनाधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी(अतिक्रमण निर्मुलन)वडसा, वनपरिक्षेत्राधिकारी(वन्यजीव) व विभागीय कार्यालयातील वन सर्वेक्षक, क्षेत्र सहायक, नियतक्षेत्र वनरक्षक आदींनी संबंधित वनक्षेत्राचे सर्वेक्षण व सीमांकन केले असता ०.८५ हेक्टर आर क्षेत्र हे वनविभागाचे संरक्षित वन असल्याची खात्री सर्वेक्षकांनी दिली. त्यानंतर अतिक्रमण काढून टाकण्याचे निर्देश वरिष्ठांकडून वनाधिकाऱ्यांना प्राप्त झाले.

पुढे शिवराजपूर येथील नियतक्षेत्राच्या वनरक्षकांनी संबंधित क्षेत्राची पुन्हा तपासणी करुन राजकुमार मोटवानी यांच्यावर वनगुन्हा नोंदविला व हे प्रकरण वनपरिक्षेत्राधिकारी(प्रादेशिक)वडसा यांना सादर केले.

त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी राजकुमार मोटवानी यांना अतिक्रमण काढून टाकण्याबाबत नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु मोटवानी हजर झाले नाही, त्यांनी कोणतेही निवेदन दिले नाही वा कोणताही ठोस पुरावाही दिला नाही. 

या अनुषंगाने आपण अतिक्रमण सोडावे किंवा इमारत बांधकाम केले असल्यास ते तोडून टाकावे. अन्यथा संबंधित जमिनीच्या भाडे आकारणीच्या दुप्पट दंड भरावा लागेल, असा आदेश सहायक वनसंरक्षकांनी दिला होता. मात्र मोटवानी यांनी अतिक्रमण न काढल्याने आज वनाधिकाऱ्यांची चमू मोटवानी यांच्या राईसमिलवर पोहचली आणि त्यांनी अतिक्रमित जमीन ताब्यात घेतली.  संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरुच होती.

एकच फर्म  घेते दोन योजनांचा लाभ

वडसा व अन्य ठिकाणी काही राईसमिलधारक शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत असतात. काही जणांकडे उष्ण मिल व साधी राईस मिल आहे. दोन्ही फर्म एकाच व्यक्तीच्या मालकाच्या आहेत. परंतु ही मंडळी एकाच फर्मच्या नावावर विविध योजनांचा लाभ घेऊन शासनाला चुना लावत असल्याचे दिसून येत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4M4AL
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना