रविवार, 26 सप्टेंबर 2021
लक्षवेधी :
  २५ सप्टेंबर कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्ह्यात ३ जण बाधित, तर २ रुग्ण कोरोनामुक्त             कोरचीच्या तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान दिले भाड्याने, तहसीलदारांवरच भाड्याच्या घरात राहण्याची पाळी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

फसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण?

Wednesday, 18th April 2018 12:47:23 AM

     

जयन्त निमगडे/गडचिरोली,ता.१७: डझनभर नेते बोलावूनही काँग्रेसला सोमवारच्या मोर्चात लोकांची गर्दी जमविता आली नाही. आंदोलन करण्याची सवय नसल्याने काँग्रेसला लोक जमविता आले नाही? उन्हामुळे लोक आले नाहीत? की, नेत्यांची लोकांवरील पकड ढिली झाली? असे नानाविध प्रश्न या मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

सोमवारी १६ एप्रिलला काँग्रेसने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी, मजूर व बेरोजगारांचा मोर्चा काढला. मात्र, पाच-सहाशेच्या पलिकडे लोकांची संख्या गेली नाही. आक्रोश करणाऱ्या बेरोजगारांनीही या मोर्चाकडे पाठ‍ फिरविल्याचे दिसून आले. होते ते काँग्रेसचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी. माजी खासदार नाना पटोले, युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रतिभा रघुवंशी, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, डॉ.अविनाश वारजुकर या गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नेत्यांसह प्रफुल्ल गुडधे, नरेंद्र जिचकार, नितीन कुंभलकर या नागपूरच्या नेत्यांनाही पाचारण करण्यात आले होते. बाकी जिल्ह्यातील नेते वेगळे. पण, मोर्चात नेते आणि पदाधिकाऱ्यांशिवाय लोकांची उपस्थिती नगण्य होती. अत्यंत कमी वेळात मोर्चाचे नियोजन करण्यात आले, असे युवक काँग्रेसतर्फे सांगण्यात आले. मात्र, डझनभर नेते येऊनही मोर्चात लोक येऊ नयेत, याची कारणे वेगळी आहेत. 

मारोतराव कोवासे आता पूर्वीसारखे दणकट राहिले नाहीत आणि नामदेव उसेंडी फारसे घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे या पक्षाकडे हाडामासांचे मेहनती कार्यकर्ते शिल्लक राहिले नाही. आहेत ते केवळ स्टेजवर सेल्फी काढणारे लोक! जे एखाद्या आंदोलनात आपल्यासोबत दहा लोकही आणू शकत नाही, अशा लोकांची काँग्रेसमध्ये भरमार आहे. सध्या अशाच लोकांना गोंजारणे सुरु असल्याने कॉग्रेसला जिल्ह्यात चांगले दिवस येतील, असे वाटत नाही. खरे तर, राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष कमकुवत झाल्याने काँग्रेसला विस्तार करण्यास मोठा वाव आहे. परंतु स्थानिक नेत्यांना त्यात इंट्रेस्ट दिसत नाही. आदिवासी सोबत नाही, दलित जवळ येत नाही आणि काँग्रेसकडून आपले भले होईल, असा विश्वास ओबीसींना वाटत नाही. अशा स्थितीत पक्षाची बांधणी करण्याची गरज काँग्रेसला वाटत नाही. केवळ अन्याय, अत्याचाराच्या घटना सांगून हे तिन्ही वर्ग आपल्याकडे आकृष्ट होतील, या भ्रमात काँग्रेसवाले वावरत आहेत. ते भाजपवाले पहा. बहुमताची सत्ता असतानाही बूथबांधणीसाठी जीवाचे रान करीत आहेत! पण, काँग्रेसचे लोक मात्र आपल्याच तालात आहेत. निव्वळ १३३ वर्षांची परंपरा सांगून लोकांना भुलविण्याचे दिवस आता संपले आहेत. जो सेवादल काँग्रेसचा पाया आहे; त्या सेवादलाला या पक्षाने केव्हाचेचे अडगळीत टाकले आहे. त्याची पुनर्बांधणी करण्याची गरज पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला वाटत नाही. याउलट भाजपने पक्षापेक्षा अधिक महत्त्व आरएसएसला दिले आहे. म्हणूनच दररोज टीका सहन करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपला बहुमताने सत्तेत पोहचवू शकतो, तर दोन वर्षांनी सिनिअर असणारा सेवादल काँग्रेसमुळे दखल घेण्याजोगाही राहत नाही. हा फरक काँग्रेसवाल्यांना नजीकच्या काळात कळेल, असे वाटत नाही.

अर्थात हा विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणातही यावर मंथन होत नाही. येथे विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांवर पाहिजे तसे काम नाही. संघटन कमजोर झाले आहे. महिला आघाडीच्या कार्यकर्त्या एकमेकांचे तोंड पाहत नाही. अशा परिस्थितीत मोर्चासाठी लोक येणार कुठून? आ.विजय वडेट्टीवारांनीही कालच्या मोर्चाकडे पाठ फिरवली. खरे म्हणजे, अनेक वर्षांनतर डझनभर नेते आणि त्यातही ग्लॅमर असलेले नाना पटोले येऊनही मोर्चा फसावा, यावर आता काँग्रेसने विचारमंथन करणे गरजेचे आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Z1XTH
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना