/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
जयन्त निमगडे/गडचिरोली, ता.२३
मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या, दारिद्र्य, अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या खाईत भयावह आयुष्य जगणार्या आदिवासींच्या आयुष्यात जीवनांकूर निर्माण करणारे प्रख्यात समाजसेवक डॉ़ प्रकाश व डॉ़ मंदाकिनी आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला २३ डिसेंबर रोजी ४० वर्षे पूर्ण झाली आहेत़
जेथे निबीड अरण्य, जंगली श्वापदे आणि लंगोटीवाल्या आदिवासींशिवाय काहीच नव्हते; अशा भामरागड परिसरातील हेमलकसाच्या भूमीवर डॉ़ प्रकाश आणि डॉ़ मंदाकिनी आमटे यांनी ऐन तारुण्यात पाय ठेवले़ वैद्यकीय शिक्षण आणि शहरी संस्कृतीशी जवळीक असूनही केवळ बाबा आमटेंच्या संस्कारामुळे डॉ़ प्रकाश आणि डॉ़ मंदाकिनी आमटे यांच्या मनाला हेमलकस्यातून माघारी जाण्याचा विचार शिवला नाही़ २३ डिसेंबर १९७३ रोजी आमटे दाम्पत्य हेमलकसा येथे उतरले़ सभोवताल घनदाट जंगल, अधूनमधून फुत्कारणारी महाविषारी सापांची वंशावळ, अस्वल, वाघ, रानडुकरांचा भयावह मुक्त संचार आणि शहरी माणसांना घाबरणारे आदिवासी अशा भूमीवर पहिले पाऊल ठेवणे हेच आयुष्याच्या मावळतीचे क्षण समजण्यासारखे होते़ तारुण्य कुस्करणारेच वातावरण ते! पण, पित्याची संस्कारकिरणे मंदाकिनी आणि प्रकाशभाऊंना उमेदीचा प्रकाश देत राहिले़ म्हणूनच ज्या खडतर वाटांनी या दोघांनी प्रवास केला; त्या वाटा आज आदिवासींसाठी उजेडवाटा झाल्या़ बाबा आमटेंनी त्यांचे पुत्र आणि स्नुषेला हेमलकस्याला सोडून दिले ते तेथेच आयुष्य खर्ची घालण्यासाठी़ तेव्हाचा भामरागड तालुका कसा असेल, याची कल्पना तेथे गेल्यावर येते़ जेथे सुशिक्षित लोक नाहीत, पिण्याचे शुद्ध पाणी नाही, कचराकाडीतून पायी चालण्याशिवाय दुसरे काहीच नाही, अशा ठिकाणी आयुष्य घालविण्याचा संकल्प करणे, हे काळजावर दगड ठेवण्यासारखेच होते़ मात्र, आमटे दाम्पत्याने ते केले़ आज हेमलकस्यात मोठी आश्रमशाळा उभी आहे़ पूर्वी शाळेकडे पाठ फिरविणाºया आदिवासींची मुले आता या आश्रमशाळेत ज्ञानाचे धडे गिरवत आहेत़
चार-पाच वर्षांपूर्वी डॉ़ प्रकाश आमटे यांची मुलाखत घेण्याचा योग आला होता़ खडतर प्रवासाचे त्यांना दु:ख नाही़ पण, गरीब आदिवासींना माणूसपण मिळाले, याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर झळकत होता़ तेव्हा आदिवासी माणूस शहरातील माणसांना घाबरायचा़ कारण दोघांची भाषा आणि संस्कृती वेगळी़ पण, प्रकाशभाऊंनी माडिया आणि गोंडी शिकून आदिवासींचा विश्वास संपादन केला़ केवळ जंगली श्वापदांची शिकार करून आणि रानमेवा खाऊन पोट भरणे एवढेच त्यांना ठाऊक होते़ मात्र, प्रकाशभाऊंनी त्यांना शेती करणे शिकविले़ २४ डिसेंबर हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस़ दोघेही उच्चशिक्षित़ पण, त्यांचे लग्न झाले अत्यंत साधेपणाने़ लग्नात ना भटजी, ना बँडवाजा़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून हे डॉक्टर दाम्पत्य विवाहबद्ध झाले़ पुढे मंदाताई प्रसूतीसाठी माहेरी गेल्या आणि प्रकाशभाऊ एकटेच हेमलकस्याच्या झोपडीत राहून सेवेत मग्न होते़ मंदातार्इंनी पुत्ररत्नास जन्म दिला आणि ही गोड बातमी प्रकाशभाऊंना समजली तब्बल एक महिन्यानंतर! आयुष्याचे असे एकेक पैलू प्रकाशभाऊंनी त्यावेळी उलगडले होते़ लोकबिरादरीचा वर्धापनदिन आला की, या पैलूंना सादर करण्याचा मोह आवरत नाही़
२३ डिसेंबरला लोकबिरादरी प्रकल्प ४१ व्या वर्षात पदार्पण केले आहे़ २३ डिसेंबर हा लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापन दिन, २४ डिसेंबर हा डॉ़प्रकाश आणि डॉ़मंदाकिनी आमटे यांच्या लग्नाचा वाढदिवस, २५ डिसेंबरला मंदाकिनी आमटे यांचा वाढदिवस, तर २६ तारखेला बाबा आमटेंचा जन्मदिवस आहे़ बाबांचे हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणूनही साजरे केले जाणार आहे़ २३ ते २६ डिसेंबर हे चार दिवस लोकबिरादरी प्रकल्पासाठी आनंदपर्वणीच असते़ यंदा तेथे दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत़ लोकसेवेचा व्रत घेतलेली ही बिरादरी काही औरच आहे़ केवळ आदिवासींना नव्हे, तर जंगली श्वापदांनाही माणूसपण देण्याचे काम प्रकाशभाऊंनी केले़ एकीकडे जात, धर्म, पंथ व भाषेच्या नावाखाली लोक जनहिंस्त्र होत असताना हिंस्त्र पशूंना अंगा-खांद्यावर खेळविताना अहिंसेशी नाते सांगणार्या प्रकाशभाऊंच्या या लोकोत्तर कार्यास शुभेच्छा!