/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१९: धानोरा तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त पुस्टोला येथील मूळ रहिवासी असलेल्या ज्योती सुकरु आतला या तरुणीने कृषी अर्थशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. आदिवासी गोंड जमातीतून कृषी अर्थशास्त्र विषयात आचार्य पदवी संपादन करणाऱ्या ज्योती या महाराष्ट्रातील बहुधा पहिल्याच महिला आहेत.
‘भारतातील भाताची संभाव्य आणि स्पर्धात्मक निर्यात’ हा त्यांच्या पीएचडीच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन अधिकारी डॉ.व्ही.जी.पोखरकर यांचे मार्गदर्शन लाभले. ज्योती आतला यांनी अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून पदवी व पदव्युतर शिक्षण घेतले आहे.
ज्योती आतला यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण कारवाफा येथील शासकीय आश्रमशाळेत झाले. त्यानंतर गडचिरोली येथील राणी दुर्गावती कन्या विद्यालयातून आठवी ते दहावी, तर जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. ज्योतीचे वडील गट्टा येथील शाळेत अप्रशिक्षीत शिक्षक होते, तर आई गृहिणी आहे. त्यांचे पती नीतेश पुसाम हे कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील रहिवासी असून, सध्या ते लातूर जिल्ह्यात कृ्षी अधिकारी आहेत.