शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने अहेरी विधानसभेचे समीकरण बदलणार..!

Saturday, 4th December 2021 01:17:11 AM

गडचिरोली,ता.४: पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देसाईगंज येथील जाहीर सभेत धर्मरावबाबा आत्राम यांना लोकसभेचे तिकिट देण्याची घोषणा केल्यानंतर अहेरी विधानसभा क्षेत्रातील नवी समिकरणे कशी असतील, याविषयी आता चर्चा होऊ लागली आहे.

१८ नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी देसाईगंज येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार यांनी सूचक वक्तव्य केले. तत्पूर्वी धर्मरावबाबांनी ‘मला गल्लीतून दिल्लीत पाठवा’ अशी गळ घातली होती. त्यावर उत्तर म्हणून पवारांनी ‘तुम्ही लोकसभेची तयारी करा भाग्यश्रीला यंदा विधानसभेला संधी देणार’, असे जाहीर केले. यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात विविध राजकीय पक्षांनी खलबतं सुरू केली आहेत. येत्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ते दिसून येईल.

गेल्या तीन दशकांपासून आमदार धर्मरावबाबा आत्राम अहेरी विधानसभा क्षेत्रातून लढत राहिले. परंतु पवारांनी शब्द पाळला, तर धर्मरावबाबा हे विधानसभेच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीत दिसणार नाहीत. आठ दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या खलबतांवरुन राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, अशी चर्चा सुरु आहे. अशावेळी अहेरी क्षेत्रातील समीकरणे नक्कीच बदलतील, असे गणित मांडले जात आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणीदेखील सुरू केल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर, मध्यावधी निवडणुका झाल्यास किंवा अडीच वर्षांनंतर २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेस तिकिट देईल. कारण शरद पवार यांनीच तशी घोषणा केली आहे. परंतु काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांसांमोर उमेदवारीचा पेच उभा राहणार आहे.

गतवेळी भाजपकडून एनवेळी उमेदवारी घोषित करण्यात आली होती. राजे अम्ब्रीशराव हे त्यावेळी आमदार असल्याने त्यांना तिकीट मिळणारच, हे जवळपास निश्चीत असतानाही संदीप कोरेत या नवख्या तरूणाचे नाव चर्चेत आले. धर्मरावबाबा आत्राम यांच्याही नावाचा भाजपने विचार केला होता. तरीही राजेंनी तिकीट मिळवलचं. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आपल्या लेटलतीफ वृत्तीमुळे संपूर्ण क्षेत्रात राजेंबाबात नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळेच त्यांचा पराभव झाल्याचे जाणकार सांगतात.

परंतु त्यावेळी दीपक आत्राम यांना मिळालेल्या भरघोस मतांमुळे सर्वानांच आश्चर्य वाटले. या मतांमध्ये काँग्रेस पक्षासह जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मतांची टक्केवारी अधिक होती, अशी चर्चा नेहमीच असते. विशेष म्हणजे अहेरी विधानसभेत कित्येक वर्षानंतर काँग्रेसने आघाडीधर्म मोडून दीपक आत्राम यांना तिकिट दिले होते.. यंदा मात्र काँग्रेस पक्ष नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याचे समजते. दीपक आत्रामांच्या धरसोड वृत्तीमुळे पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराज आहे. जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांची क्षेत्रात वाढलेली शक्ती पाहता ते यावेळी मोठ्या भूमिकेत दिसतील. मंत्री विजय वडेट्टीवारांसोबत त्यांचे असलेले सबंध सर्वश्रुत आहेत, त्यामुळे ते यंदा काँग्रेसचा हात धरणार की, आदिवासी विद्यार्थी संघासोबत राहणार, हेदेखील महत्वाचे ठरणार आहे.

सद्याच्या घडीला काँग्रेस पक्ष आलापल्ली येथील सेवानिवृत्त वनपरिक्षेत्राधिकारी एच. जी. मडावी यांच्या नावाचा विचार करत असल्याची माहिती आहे. मडावी यांनी आपल्या नोकरीकाळात या क्षेत्रात बराच काळ घालविला आहे. मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांची प्रतिमा चांगली आहे. आदिवासी समाजातही त्यांना आदराचे स्थान आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. २०१९ मध्येच विजय वडेट्टीवार यांनी श्री.मडावी यांना काँग्रेसकडून उभे राहण्यास सांगितले होते. परंतु मडावी यांनी तेव्हा स्वारस्य दाखविले नव्हते. परंतु पुढच्या निवडणुकीत एच.जी.मडावी यांच्या नावाचा विचार होईल, असे दिसते.

भाजपमधील गटबाजी बघता अनेकजण उमेदवारीकरिता बाशिंग बांधलेले पाहायला मिळतात. मागीलवेळी संदीप कोरेत यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी संघाचा एक गट पूर्णवेळ सक्रिय होता. निवडणुकीच्या तोंडावर क्षेत्रात दौरे करून या तरूणाने काही प्रमाणात हवा निर्माण केली होती. मात्र, विधानसभेची जागा जिंकण्यासाठी ती अपुरी होती. म्हणूनच राजेंना उमेदवारी देण्यात आली. सुरवातीच्या काळात तरूण चेहरा म्हणून अम्ब्रीशरावांची लोकांमध्ये चांगलीच लोकप्रियता होती. मात्र, त्यांनी आपल्या उदासिन स्वभावामुळे ती गमाविल्याने पराभव पत्करावा लागला. अजूनही ती वृत्ती कायम असल्याने यंदादेखील त्यांच्यासाठी ही निवडणूक अडचणीची ठरणार, असे जाणकार सांगतात.

अहेरी विधानसभेतील रोजगाराचा प्रश्न असो की अंतर्गत रस्त्यांची अवस्था, यामुळे लोकांमध्ये धर्मरावबाबांविषयी नाराजी बघायला मिळते. सोबतच सुरजागडप्रकरणी गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेपामुळे त्याभागातील आदिवासी समाज व युवक देखील त्यांच्यावर चांगलेच नाराज असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत भाग्यश्री आत्रामांसाठी ही जागा वाचविणे मोठे दिव्य असणार आहे.

या सगळ्या चर्चित नावांसोबत अम्ब्रीशराव यांचे चूलत बंधू रामेश्वररावबाबा आत्राम यांचेदेखील नाव दरवेळेस चर्चेत असते. राजघराण्यातील असूनही सर्वासोबत मिसळणारा चेहरा म्हणून त्यांच्याविषयी येथील जनतेच्या मनात वेगळा आदर व सहानुभूती आहे. त्यामुळे रामेश्वरबाबांनी निवडणुकीत उडी घेतल्यास वेगळे चित्र पहायला मिळू शकते. माडिया जमातीतील पहिले डॉक्टर कन्ना मडावी यांचे नावदेखील प्रत्येकवेळी चर्चेत असते. यावेळी भाजप किंवा काँग्रेसकडून त्यांच्या नावाचादेखील विचार केला जाण्याची शक्यता नकारता येत नाही. एकंदरित विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम हे लोकसभेत गेल्यास विधानसभेच्या निवडणुकीत अनेक नवे चेहरे पटलावर दिसतील. गेल्या दोन दशकापासून या क्षेत्रातील जनतेने तेच ते उमेदवार बघितले आहेत. सर्वांनाच संधी दिली. क्षेत्राला बराच काळ मंत्रिपददेखील मिळालं. पण विकासाच्याबाबतीत सर्वच नेत्यांची भूमिका कमकुवत होती, असे येथील तरूण बोलून दाखवितात. तेव्हा अहेरी विधानसभेतून यंदा नवा चेहरा विधीमंडळात गेल्यास नवल वाटायला नको.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
L3FTC
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना