/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
कोरची, ता. ३: एका युवकाने तरुणीवर चाकूने हल्ला करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना आज कोरची तालुक्यातील टेमली येथे घडली. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाल्याचा अंदाज आहे. विक्रम फुलकंवर (२४) असे मृत युवकाचे नाव आहे.
विक्रम हा मोलमजुरी करण्यासाठी गडचांदूर येथे गेला होता. ३० जुलैला तो टेमली येथील आपल्या घरी आला. २ आॅगस्टच्या रात्री त्याने बारावीत शिकणाऱ्या तरुणीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास पीडित तरुणीच्या काकाने विक्रम फुलकंवर याचे घर गाठून विक्रमने माझ्या पुतणीवर चाकूने हल्ला केल्याचे विक्रमचे वडील ग्यानसिंग फुलकवर यांना सांगितले.
त्यानंतर दोघांनीही घटनास्थळी जाऊन पाहिले असता तरुणी बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यांनी तिला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर घरी जाऊन बघितले असता विक्रम फुलकंवर घरी नव्हता. गावात विचारणा करूनही तो सापडला नाही. मात्र आज सकाळी एका घराच्या मागच्या बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत विक्रमचे मृतदेह आढळून आला. दरम्यान, जखमी युवतीला गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.
याप्रकरणी बेळगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी अधिकारी अनिल नानेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कुंभारे तपास करीत आहेत.