/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.३०: विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी आणलेल्या प्रस्तावानंतर राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नसून, सरकारने पूरग्रस्तांची घोर निराशा केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी आज येथे केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केल्यानंतर आ.जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ.पाटील पुढे म्हणाले, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. परंतु गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती भयावह असतानाही शिंदे यांनी मदत केली नाही.राज्याच्या इतर भागांतही हीच स्थिती आहे.नव्या सरकारची जुळवाजुळव करण्यापासून त्यांना वेळ मिळत नाही, असा टोला लगावत आ.पाटील यांनी सध्याच्या सरकारकडून कुठलीही अपेक्षा करणे व्यर्थ असल्याची टीका केली.
सध्याचे राज्य सरकार किती काळ टिकेल,हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. मात्र, न्यायालयाच्या निकालाला चार ते पाच वर्षे विलंब होईल, असा दावा बंडखोर आमदारांकडून केला जाणे धक्कादायक आहे. हे लोक आता न्यायालयालाही गृहीत धरत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
राज्यपाल असो की लोकप्रतिनिधी, सर्वांनी लोकशाहीच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम, अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.