शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली-चिमूर क्षेत्र: महायुती चर्चेत नसलेला उमेदवार देण्याची शक्यता

Thursday, 14th March 2024 06:57:34 AM

गडचिरोली,ता.१४: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवाराबाबत महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दहा वर्षांपासून भाजपकडे असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास भाजपचे काही नेते इच्छूक असल्याची चर्चा सुरु असताना आता भाजप चर्चेत नसलेल्या नावावर शिक्कामोर्तब करु शकते, अशी विश्वसनीय माहिती आहे.

भाजपचे अशोक नेते हे मागील दहा वर्षांपासून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या अशोक नेतेंनी दोन महत्वाचे विकास प्रकल्प मार्गी लावले. त्यातील एक म्हणजे वैनगंगा नदीवरील चिचडोह व कोटगल हे दोन बंधारे आणि दुसरे म्हणजे वडसा-गडचिरोली हा ५२ किलोमीटरचा लोहमार्ग. हा लोहमार्ग छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर आणि तेलंगणातील मंचेरियलपर्यंत जोडण्यासाठी खा.नेते यांनी केलेला पाठपुरावा सर्वश्रूत आहे. असे असताना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षातूनच विरोध झाला. गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी स्वत:च खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूचनेनुसार डॉ. मिलिंद नरोटे चांगला चालणारा दवाखाना बंद करुन कामाला लागले. नरोटेंचे नाव फायनल झाल्याची रिंगटोन ऐन तिकिट वाटपाच्या सिजनमध्येही वाजायला लागली, तेव्हा खा.अशोक नेते खळबळून जागे झाले आणि त्यांनी दिल्ली गाठली. त्यानंतर संघामध्येही अशोक नेते यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली.

मात्र, बुधवारी(ता.१३) भाजपने महाराष्ट्रातील आपली पहिली यादी जाहीर केली, त्यात गडचिरोली-चिमूरचे नाव नव्हते. राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडावा, असा मतप्रवाह भाजपच्या प्रदेशस्तरावरील नेत्यांमध्ये निर्माण झाला. आपल्याला लोकसभेचे तिकिट मिळाले तर विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातही महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने विजयी होतील, असा युक्तीवाद ते महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे करीत आहेत. विशेष म्हणजे, धर्मरावबाबा आत्राम ज्या अहेरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात; तेथे सुरजागड लोहप्रकल्पाचे मोठे काम उभे झाले आहे. जिंदाल आणि अदानी हेही भविष्यात रस्ते खराब करायला येणारच आहेत. झेंडेपार खाणही पाईपलाईनमध्ये आहे. या मोठ्या उद्योगांचे मजबूत पाठीराखे म्हणून धर्मरावबाबांकडे पाहिले जात आहे. जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सुरजागडसारख्या उद्योगांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा धर्मरावबाबांसारखा लोकप्रतिनिधी हवा, यावर खुद्द भाजपच्या प्रदेशस्तरीय नेत्यांचेसुद्धा एकमत झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे नरोटे वा नेते यांची नावे मागे पडल्याचे बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर शांत स्वभावाचे व्यक्तीमत्व अशी ओळख असलेले आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांचे नाव चर्चेत आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना गजबे यांचा स्वभाव आणि कार्यशैलीने भुरळ घातली आहे. अशा स्थितीत महायुती कृष्णा गजबे या चर्चेत नसलेल्या नावावर शिक्कामोर्तब करु शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7TE7A
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना